दोन गझला : डॉ. सुभाष कटकदौंड


१.

ना ऐकले कुणीही मी ओरडू कशाला
शब्दात राग माझ्या मी पाखडू कशाला

काळा फळा मुलांचा रंगीत रोज झाला
व्यवहार ज्ञान नाही हाती खडू कशाला

हातातली फुलेही कोमेजलीत सारी
प्रेमात मी सखीच्या आता पडू कशाला

संवाद मूक झाले रुसलेत शब्द सारे
बोलायचे तुला तर ओठी कडू कशाला

मी मुक्त आज केले माझ्याच भावनांना
सुकलीत आसवेही आता रडू कशाला

सुविचार फक्त आता उरलेत कागदावर
मी त्याच कागदांच्या मागे दडू कशाला

मी काजवाच झालो पडला उजेड माझा
अंधार दूर झाला मार्गी अडू कशाला

२.

करावे काय मी केव्हा कधी ना योजले होते
तसेही तेच मी केले मला जे वाटले होते

किती साधी तिची भाषा जणू काहीच ना घडले
परी ते शब्द माझ्याशी मुक्याने भांडले होते

उडाली पाखरे सारी कुणी ना पाहिले मागे
तरी ते प्रेम आईचे कधी ना आटले होते

कितीदा हारलो होतो कधी मी मोजले नाही
उधळले डाव सारे ते नव्याने मांडले होते

जरी अंधारले होते तरी मी थांबलो नाही
विचारांच्या प्रकाशाने जगाला शोधले होते

....................................
डॉ. सुभाष कटकदौंड, खोपोली
मो ९५६१२८४४०८

1 comment:

  1. दोन्ही गझला केवळ अप्रतिम सर 👍👍

    ReplyDelete