दोन गझला : प्रभाकर पवार



१.

मोठमोठाल्या नद्यांना आटतांना पाहिले
आसवांचे पूर येथे वाहतांना पाहिले

पाचवीला आमच्या दुष्काळ पुजलेला जरी
बापजादे सातबारा राखतांना पाहिले

आज मोबाईलचा आहे जमाना हा सखे
का तरी पत्रे तुला मी चाळतांना पाहिले

बंगला गाडीत त्यांनी शोधली काही सुखे
झोपड्यांना मी सुखाने नांदतांना पाहिले

हात प्रेमाने तिचा हातात जेव्हा घेतला
का तिच्या मी स्पंदनांना वाढतांना पाहिले

२.

सावळा रंग आम्हा तुझा भाळतो विठ्ठला
हाच तो रंग चिंता खर्‍या जाळतो विठ्ठला

बोलतो एक करतोय दुसरेच काही तरी
जो दिला शब्द तो कोण बरे पाळतो विठ्ठला ?

दु:ख भाळी तसे येत असते जिवाला जगी
रोज नैराश्य आले तरी टाळतो विठ्ठला

माणसे रोज निजली चितेवर किती ईश्वरा
का तुझी वीट तू फक्त कवटाळतो विठ्ठला ?

हात सोडून दे तू कटीचे अन् धावून ये
आसवे रोज मी खूपशी गाळतो विठ्ठला

....................................

प्रभाकर पवार
९३२१७७३१६३

2 comments:

  1. वाह... प्रभाकर सर, दोन्हीही गझला अप्रतिम आहेत.
    अप्रतिम!
    -डॉ शशिकांत गंगावणे.

    ReplyDelete