तीन गझला : बाळ पाटील



१.

केला विचार त्याने जैसा तळातला
गेला सुटून तोवर मासा गळातला

सारेच थेट रस्ते झालेत वाकडे
मिरवून उंट गेला बुद्धीबळातला

"ही सार्वभौम पृथ्वी माझीच मालकी"
आहेस कोण तू पण कुठल्या बिळातला

नेत्रासमीप तुझिया तू राहु दे जरा
होईन अंश थोडा मी काजळातला

ते लेकरू जरी ती स्वप्नात पाहते
झरतो लगेच पान्हा बघ आचळातला

२.

एक व्हावा मुक्ततेचा सोहळा
मीच माझा आवळावा हा गळा

ही मधाची चव तुरट का लागते
की तिने नुकताच खाल्ला आवळा

नेमक्या वर्मावरी बघ बोट ते
वाटला नाही तसा तो आंधळा

सोबती आयुष्यभर बगळेच की
शेवटी नाराज झाला कावळा

प्रेतयात्रा पाहिली अन् वाटले
एकदाचा जाहला तो मोकळा

३.

सुरुवातीला थोडा तेथे तणाव झाला
दे-घे झाली ,अन् मग पारित ठराव झाला

सोसत आली,चालत गेलो कितीतरी मी
वाटेलाही आता माझा सराव झाला

जाळिन म्हणतो सूर्यालाही क्षणात येथे
फारच बालिश अंधाराचा स्वभाव झाला

चोरुन नेतो माणुस त्यांच्या कलागुणांना
माकडजाती मधुनी एकच उठाव झाला

जेथे दिसल्या समचरणांच्या तुझ्या खडावा
तो कायमचा या माथ्याचा पडाव झाला
 
..............................
 
 बाळ पाटील

No comments:

Post a Comment