तीन गझला : बाळू घेवारे

१.

नांदावयास ये तू माझ्या घरी विठोबा
लपवून ठेवली मी आहे सुरी विठोबा

शाबूत अंग सारे दिसते तुम्हास माझे
ते घाव आपल्यांचे रुतले उरी विठोबा

आले जवळ कशाला जाणून घे विठोबा
ठेवू नको भरोसा त्यांच्यावरी विठोबा

एकेक पेग मारू खंबा करू रिकामा
पत्नी, मुले उपाशी असली जरी विठोबा

बोलू नकोस खोटे सांगून माय मेली
दिसली मला न कोठे दुनिया खरी विठोबा

खाण्या जरी मिळाली बर्फी, पुरी, जिलेबी
घरचीच गोड लागे ती भाकरी विठोबा

लावून ध्यान बसलो हृदयात साठवाया
डोळ्यात बंद दिसते बजबजपुरी विठोबा

वारीत कैक वेळा चालून परत आलो
झाली न एकदाही वारी तरी विठोबा

२.

माणूस जोडण्याचा आहे स्वभाव माझा
खोट्यास ठोकण्याचा आहे स्वभाव माझा

पटते इथे न माझे माझ्यासवे तरीही
सर्वांत राहण्याचा आहे स्वभाव माझा

ना ठेवतो कधीही राखून हातचे मी
सर्वस्व वाटण्याचा आहे स्वभाव माझा

नात्यांस जोडणारा मी पूल एक साधा
आतून बांधण्याचा आहे स्वभाव माझा

घेतो जरी भरारी विस्तीर्ण त्या नभांगी
मातीत खेळण्याचा आहे स्वभाव माझा

३.

कळेना कुणाला कसे पांडुरंगा?
कुणाचा भरोसा नसे पांडुरंगा

तुझा वास नाही असा ना ठिकाणा
कुठेही तुझे बा ठसे पांडुरंगा

पिके डोलताना असे वाटते की,
शिवारी तुझे आरसे पांडुरंगा

नको अंतरू दीनबंधू ,सख्या, बा
तुझ्यावीण माझे हसे पांडुरंगा

कसा संत त्यांना म्हणू सांग आता?
दिसति त्याच हाती ससे पांडुरंगा

विधी योग, यागा न जाणे परंतू
तुझ्या भाव चरणी असे पांडुरंगा

4 comments:

  1. व्वा! तीनही गझला अप्रतिम!

    ReplyDelete
  2. वाहह...तिघही गझला खूप सुंदर....विठ्ठलमय

    ReplyDelete