तीन गझला : जयदीप विघ्ने


१.

विझवल्यावर नवा भडका उडू लागायचा
तिला राखेत किंतू सापडू लागायचा

तुझ्या ओठावरी स्वागत, किळस नजरेमधे
तुला वावर किती माझा कडू लागायचा

डहाळीसारखा जेव्हा कण्हू लागायचो
तिला तेव्हाच झोका आवडू लागायचा

नजर टाळून जेव्हा पाठमोरी व्हायची
तिचाही तोल तेव्हा धडपडू लागायचा

इथे मन आदळू लागायचे माझे किती
तिथे दैवा मला तू पाखडू लागायचा

२.

राहिलो मी झिजत टाळासारखा
जन्म विधवेच्या कपाळासारखा

बोलली होती तुझी स्वप्ने मला
'तू बुडाशी थांब गाळासारखा'

हात धरल्यावर पुन्हा नाही सुटत
दोस्त नसतो मिळत काळासारखा

पाहतो लांबून मी लगबग तुझी
का तुला येतो उमाळा सारखा

वैर तू धरलेस कुठले पावसा
आमचा करतो उन्हाळा सारखा

३.

एवढा आधार दे पोकळ मला
मारना हाका कधी प्रेमळ मला

मी कुणाला वाटलो होतो खुळा
वाटले होते कुणी प्रांजळ मला

मी असे बोलून खोटे जायचो
पोचली नाही कधीही झळ मला

वेल तू आहेस झालो झाड मी
ये कधीही ये गडे आवळ मला

मी मला इतक्यात इतके सांगतो
शक्य झाले तर कधी आढळ मला

........................
जयदिप विघ्ने
7972449691

4 comments: