तीन गझला : मसूद पटेल


१.

अनेक मोसम आतुर होते मला भेटण्यासाठी
मीच कदाचित उशीर केला दार उघडण्यासाठी

अता घरी तो कोपऱ्यामधे उदास बैसुन असतो
प्रसिद्ध होता खूप कधी जो सतत हासण्यासाठी

भाषा जेव्हा अडसर ठरली अमुच्या प्रेमामध्ये
मौनाचा आधार घेतला अम्ही बोलण्यासाठी

पस्ताव्याच्या अग्नीमध्ये दोघे जळले नसते
कुणी एक जर धजला असता क्षमा मागण्यासाठी

ना गावे ना घरे अम्हाला ना थांबाया थांबे
जणू जन्मलो येथे आम्ही फक्त भटकण्यासाठी

नयनी माझ्या सागर आहे असे समजल्यापासुन
वाळवंट वणवणतो आहे मला शोधण्यासाठी

निघण्या आधी चल शेवटचे बोलुनघेऊ थोडे
युग लागेल कदाचित आता मला परतण्यासाठी

२.

स्त्री जन्म घेतल्याची शिक्षा जणू मिळाली
दोन्ही घरात अमुची अवहेलनाच झाली

पुरते फुलावयाची संधी कुठे अम्हाला
खुडल्या अनेक वेळी जातो अम्ही अकाली

माता , पित्यास माझ्या खोटीच आज वा-या
जाऊन सांगना तू माझी जरा खुशाली

जाळून स्वत्व करतो रोशन घरे तरीही
अंधार फक्त असतो अमुचा सदैव वाली

राहो घरी पित्याच्या वा मग घरी पतीच्या
गणना सदैव अमुची आश्रित म्हणून झाली

देवी समान दर्जा ग्रंथी जरी मिळाला
वाट्यास मात्र अमुच्या हेटाळणीच आली

जयघोष संस्कृतीचा इकडे सतत सुरू अन् 
निष्पाप सून तिकडे तिरडीवरी निघाली

३.

पाया खाली जरी निखारा
दृष्टीमध्ये आहे तारा

म्हणून उरली नदी नि झाडे
दुरून गेला रोड बुहारा

जरी भोवरा दूरस्थ आहे
सुटतो आहे मात्र किनारा

द्वेष आक्रमक झाला आहे
जपून ठेवा भाईचारा

शब्द निरर्थक सार्थ जाहले
जसा मिळाला तुमचा थारा

ओठ टेकले फक्त जरा मी
आटुन गेला सागर सारा

दुखावला जर असेल तू तर
क्षमा असूदे रसिक उदारा

सवड दिली जर आयुष्याने
घेइन तुमची भेट दुबारा

स्टेशन बहुधा जवळच आहे
' मसूद ' आवर अता पसारा

...................................  मसूद पटेल                    ९६०४६५३३२२

8 comments:

  1. वाह सर! बढिया !!

    ReplyDelete
  2. या तिन्ही रचना खूप सुंदर! आणि माझ्या खूप खूप आवडत्या!सर,सहज सुंदर शब्दांत चपखलपणे आपण जेव्हा वास्तव मांडता आम्ही अक्षरशः या लेखणीच्या प्रेमात पडतो!😊

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम धन्यवाद ताई !

      Delete
  3. Replies
    1. सप्रेम धन्यवाद सर !

      Delete