१.
जरा थांबून केलेला पुकारा हा;
तुझ्या लक्षात आला का इशारा हा.
कशाला जीव वेड्या जाळतो इतका;
तुला जर जायचे सोडुन पसारा हा.
पुरे झाल्या अता लाटांवरी शंका;
तुला बोलावतो आहे किनारा हा.
कधी संतापतो मीही इथे मजवर;
पकडला मी कशाकरिता निखारा हा.
खरे कळले तुझ्यावर प्रेम
जडल्यावर;
कसा असतो मनावरती पहारा हा.
२.
भावना एक अफवा आहे;
कोण मनाने हळवा आहे.
फुटले ओठांवर हसू तिच्या;
दिवा पेटला हिरवा आहे.
धार बघुन घे 'शेरा'ची तू;
शब्दांमध्ये बिचवा आहे.
प्रीत असे जन्मोजन्मीची;
युगायुगाचा रुसवा आहे.
त्या वाटेने जावे आधी;
ज्या वाटेवर चकवा आहे.
कष्ट वगैरे काही नाही;
चिंतेचा हा थकवा आहे.
३.
शब्द साधा एवढा उच्चार नाही;
ऐक, कवितेसारखे हत्यार नाही.
खर्च केली पुस्तकांवर ह्या कमाई;
फर्निचरने थाटले घरदार नाही.
झूठ आहे प्रेमबिम हे शपथ,वचने;
पण कुणी मानायला तय्यार नाही.
तू नको इतक्यात भाळी विजय गोंदू;
घेतली अद्याप मी माघार नाही.
हे कुणा कळले खरे दुखणे जगाचे;
हा कुणापाशी खरा उपचार नाही.
तिनही गझल सुंदर👌
ReplyDeleteबिचवा अप्रतीम💐💐