तीन गझला : प्रफुल्ल कुळकर्णी


१.

गळे फूल वा-यामुळे 
जवळच्या शिका-यामुळे 

चुकीची दिशा भेटते 
चुकीच्या इशा-यामुळे 

विनाकष्ट रस्ता मिळे
पुढे चालणा-यामुळे

मिळे रूप काचेसही
निराकार पा-यामुळे

असे मोल दारा तुझे
कडी घालणा-यामुळे

उजेडाघरी मी उभा
दिवे लावणा-यामुळे

किती देह वैतागतो
मनाच्या पसा-यामुळे 

२.

कधी पूर येतो कधी निर्जळी
तुझी धोरणे का अशी वेगळी?

कधी रोप काढून टाकू नये 
जमीनीत आक्रंदते पोकळी 

जरी बंगले बांधले खेटुनी
सलोख्यात जागा हवी मोकळी

उभी अन्नछत्रेच शाळेमध्ये 
भुकेचा कुणीही नसावा बळी

तुला घट्ट बांधेल माझ्यासवे 
अशी जीवना पाहिजे साखळी

३.

झोप पेंगुळते मनाच्या गावभर
का उगी पण जागते सारे शहर?

माणसे गेली कधीची खर्चुनी
राहिले शिलकीत पारोसे प्रहर 

फूलही सांगे सुगंधाला सतत
घे भरारी सोड आईचा पदर

ओरडे पेशीतले कर्कशपण 
वेळ काढुन वाच मौनाची बखर

का , कधीपासून , कुठवरती उगी
काळ मागे लागला अष्टौप्रहर

No comments:

Post a Comment