एक नितांत सुंदर गझल! : अविनाश चिंचवडकर

     


         काही कविता किंवा गझला मनाचा अगदी ठाव घेतात. एकएक ओळ कशी मनाला स्पर्श करून जाते. जीवनाच्या वाटचालीवर प्रत्येक क्षणी त्या ओळींची आठवण होत राहते. एखादी सुखद वाऱ्याची झुळूक यावी तसे ती गझल वाचून वाटते. 

खरंतर चांगली गझल लिहिणे हे काही सोपे काम नाही. गझलेची जमीन म्हणजे आकृतीबंध हा मतल्यापासूनच म्हणजे पहिल्या दोन ओळीपासूनच निश्चित व्हायला हवा. काफिया, रदीफ, अलामत या सगळ्या गोष्टी सांभाळून उत्तम गझल लिहिणे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. पण म.भा. चव्हाण यांची  'खुलासा ' शीर्षकाची गझल या सगळ्या कसोट्यांवर खरी उतरते. 

खुलासा

तुला मी टाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी
जीवाला जाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी

मनाई मी मला केली कुणाशी बोलण्याचीही
मला सांभाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

मनाच्या पावसाळ्याची कहाणी संपली माझी
उन्हे मी गाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

फुले जी वाळली त्यांनी दिली वार्ता सुगंधाची
ऋतू रेंगाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

खुलासा ऐक तू माझा खुलासा ऐकण्याआधी
खुलासा टाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

- म.भा.चव्हाण

या गझलेचा मतलाच मनाचा ठाव घेतो. अत्यंत सोप्या शब्दात अगदी नेमकेपणाने गझलकाराने आपल्या प्रियेला 'खुलासा ' सादर केला आहे.

तुला मी टाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी
जीवाला जाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी

प्रिये, मी तुला का टाळतो आहे, हा प्रश्न तुला कदाचित पडला असेल! पण तुझे माझे एकत्र येणे या ढोंगी दुनियेला कदापि पसंत पडणार नाही. म्हणूनच मी माझा जीव जाळतो आहे आणि तुला टाळतो आहे.

 'तुझ्यामाझ्या भल्यासाठी ' एवढा प्रदीर्घ रदीफ वापरण्याची कवीची कल्पना अफलातूनच आहे. एवढा मोठा रदीफ असूनही त्यामुळे कुठेही रसभंग होत नाही. टाळतो आहे ,जाळतो आहे हा काफिया खूपवेळा वापरल्या गेला आहे. पण तरीही या रदीफ सोबत छान वाटतो. 

ही गझल वियदगंगा या वृत्तात लिहिली आहे. 'लगागागा लगागागा लगागागा लगागागा ' असा त्याचा लगक्रम आहे. हे वृत्त कविश्रेष्ठ सुरेश भट यांचे अतिशय आवडते होते. त्यांनी या वृत्तात तब्बल १५ गझला लिहिल्याची माहिती 'सुरेश भट आणि मी' या प्रदीप निफाडकर यांच्या पुस्तकात आहे. त्यामध्ये अतिशय गाजलेल्या गझला 'जगाची झोकुनी दुःखे, सुखाशी भांडतो आम्ही ' किंवा 'स्मराया सारखा आता तसा मी राहिलो नाही ' यांचा समावेश आहे. श्री म.भा.चव्हाण हे सुरेश भट यांचे आवडते शिष्य होते. त्यामुळे सुरेश भट यांचे संस्कार त्यांच्या गझलेवर जाणवतात. परंतु त्यासोबतच त्यांनी स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केली, हे 'खुलासा ' या गझलेत सतत जाणवत राहते.

'मनाई मी मला केली कुणाशी बोलण्याचीही
मला सांभाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

माझ्या ओठांना मी बोलण्याचीही बंदी आता केली आहे, कारण बोलताना मी तुझा उल्लेख केला तर पुन्हा विषारी प्रहार तुझ्यावर होतील. आणि तेच मला नको आहे 

'मनाच्या पावसाळ्याची कहाणी संपली माझी
उन्हे मी गाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

सखे, प्रेम आणि सुखाचा तो स्वप्नील बहर कधीच ओसरून गेला आहे. आता फक्त कठोर, कटू वास्तव माझ्यासमोर उभे आहे. मन मोहवणारी श्रावणाची रिमझिम कधीच ओसरली आहे आणि फक्त कडक उन्हात तप्त पायवाटेवर वाटचाल करणे माझ्या नशिबात आहे. 

'पुन्हा जो कोरडा झाला असा मी माळ एकाकी
पुना भेगाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

पुन्हा एकदा मी जेथून निघालो तेथेच येऊन पोचलो आहे. माझ्या आयुष्याची वाटचाल  वाळवंटापासून सुरु झाली होती. तुझ्या चाहुलीने काही काळ माझ्या जीवनात प्रीतीचा ओलावा निर्माण झाला होता. पण आता पुन्हा त्या रुक्ष माळासारखा मी एकाकी झालो आहे. 

'फुले जी वाळली त्यांनी दिली वार्ता सुगंधाची
ऋतू रेंगाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

हा गुलाबी सुगंध कोठून येतो आहे? कदाचित तुझ्या आगमनानेच या वाळलेल्या फुलांना सुगंध येऊ लागला असावा. मला तर असे वाटते की तू यावीस म्हणून हा ऋतूपण रेंगाळत असावा. 

'खुलासा ऐक तू माझा खुलासा ऐकण्याआधी
खुलासा टाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

म्हणूनच प्रिये आज मी माझा खुलासा तुझ्यासमोर मांडतो आहे. पण हा खुलासा तुला पटेल का, हा सुध्दा एक प्रश्नच आहे. म्हणूनच मी खुलासा करण्याचेही टाळतो आहे, जीवाला जाळतो आहे !

डोळ्यासमोर एक नितांतसुंदर चित्र उभे करून ही लहानशी गझल संपते! कवीचा खुलासा आपल्याला पटत जातो, तिचा चेहरा स्मरत जातो आणि आपण आपल्या आठवणींमध्ये रममाण होतो! उत्कृष्ट गझल यापेक्षा अधिक चांगली काय असू शकते?

गझलेच्या तंत्रानुसार अतिशय तंत्रशुद्ध आणि तरीही प्रभावी, भावपूर्ण अशी ही गझल ऐकून कितीतरी वर्षे झालीत ! तारुण्यात ही गझल खूपच आवडली होती, ती त्यातील प्रेमातील आर्तता हृदयाला भिडल्यामुळे! आणि आजही इतक्या वर्षानंतर ही गझल मनाला चटका लावुन जाते, ती त्यातील खरेपणामुळे! नकळत आपण गुणगुणू लागतो - तुला मी टाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी! 
........................
अविनाश चिंचवडकर, बंगलोर
avinashsc@yahoo.com
9986196940

4 comments:

  1. खूपच सुंदर रसग्रहण

    ReplyDelete
  2. मतल्यात " जिवाला" असे लिहावे .

    ReplyDelete
  3. मभा सर खरंच सुंदर लिहितात.

    ReplyDelete