१.
रात्रीत शोधले मी ,दिवसात शोधले मी
अपुले जुने जमाने हृदयात शोधले मी
घामात त्या बळीचे झाले हलाल जीणे
हे दुःख जीवघेणे शेतात शोधले मी
ती झोपडीत रडते बघ जिंदगी उपाशी
सत्तेत झिंगणाऱ्या देशात शोधले मी
हा कैफ जिंदगीचा नसतो नशेत वेड्या
कित्येकदा गड्या त्या पेल्यात शोधले मी
गाडून घेतले बघ मातीमधे स्वतःला
हौताम्य एवढ्याशा दाण्यात शोधले मी
एकेक श्वास असतो देहास भार बहुधा
पाण्यात पाहिलेल्या प्रेतात शोधले मी
प्रज्ञेत तोच हसतो शीलात तोच वसतो
साफल्य जीवनाचे बुद्धात शोधले मी
२.
दे लिहताना मला जगाचे भान विठ्ठला
जमले तर दे शब्द तुक्याचे दान विठ्ठला
किती विनवणी तुझी सावळ्या सांग करू मी ?
तुझ्या कृपेने फक्त भिजव हे रान विठ्ठला
भाव मिळू दे ,रान पिकू दे या वर्षाला
होऊ दे ना आबादाणी छान विठ्ठला !
वावरात त्या वारकऱ्याने फास घेतला
राखतो म्हणे तू भक्तांची शान विठ्ठला !
साहेबाने उभे रहावे पाहताक्षणी
व्हावा इतका सामान्यांचा मान विठ्ठला
वाट तुझी ही चुकुनही मी चुकणार कसा ?
माहित आहे पकडणार तू कान विठ्ठला
स्पर्श न व्हावा कधी मनाला थोरपणाचा
ठेव मला तू जन्मभराचा सान विठ्ठला
कधी टाळ दे , कधी विणा दे हाती माझ्या
देहच व्हावा तुझ्या स्तुतीचे गान विठ्ठला
शेरांमध्ये दुःख झरावे चराचराचे
ओत माझिया गझलेत अशी जान विठ्ठला
केवळ इतके मागत आहे तुला 'दिगंबर'
जीवन व्हावे अभंगातली तान विठ्ठला
..........................................
दिगंबर खडसे
अकोट , जि. अकोला
मो. ९६२३७३९३७८
विठ्ठला ...
ReplyDelete