१.
सोसल्या आहे किती आधी कळा
मग कुठे हा लागला नंतर लळा
ह्या ढगांनी क्रिम कशाला लावली
कृष्ण होता फार सुंदर सावळा
गाडण्याचा ठेवला पर्याय मी
जाळल्यावर लागल्या असत्या झळा
स्पर्श पिंडाला न केला यामुळे
मटण खाणारा असावा कावळा
फक्त कळला एवढा इतिहास हा
पाच मार्कांचा शिवाजी मावळा
ही तुझी साधी सुधी नाही कला ?
बोर देवुन काढते तू आवळा
तू खडू हातात जेव्हा घेतला
लाजला वर्गातला काळा फळा
मागणी होती फुलांना केवढी
देठ होता जोवरी तो कोवळा
२.
बघ चिमणीचा खोपा दिसतो
अवती - भवती धोका दिसतो
कसे मुलीचे लग्न करू मी
मला सारखा झोका दिसतो
कामाचा उंदीर धावतो
साहेबाचा बोका दिसतो
घड्याळ फोडा,काटे काढा
मला नेहमी ठोका दिसतो
रोज मुलांचे अंगण रडते
स्मार्ट फोनचा धोका दिसतो
श्रीमंतीच्या पाठीमागे
पैसा , पेटी , खोका दिसतो
..................
अभिषेक उदावंत
वाह भाई !
ReplyDelete