तीन गझला : डॉ. नरसिंग इंगळे




१.

असा आलोय भानावर
जरासे मद्य प्याल्यावर

तिला स्वप्नात मी लुटले
सखीचा आळ माझ्यावर

मला विसरून मी गेलो
तिला भेटून झाल्यावर

कसा नाही म्हणू तिजला
सखी लाडात आल्यावर

नसे काळीज हे माझे
तिथे असतो तिचा वावर

सखी तर संपदा माझी
जरा जंगम जरा स्थावर

फुले बागेत ना इतकी
तिच्या आहेत गालावर

२.

खुलेल तेव्हा कळेल ती
भिडेल तेव्हा कळेल ती

तुला न कळता बघायला
वळेल तेव्हा कळेल ती

तुझ्याचसाठी सदाकदा
झुरेल तेव्हा कळेल ती

तिने पाहता जखम तुझी
भरेल तेव्हा कळेल ती.

हवे हवे ते नको नको
म्हणेल तेव्हा कळेल ती

साखर झोपेमधे सदा
छळेल तेव्हा कळेल 
ती

३.

प्रश्न तयांचे पेटत ठेवा
जनता अवघी झुलवत ठेवा

सांगा त्यांना स्वतंत्र आपण
मात्र तयांवर पाळत ठेवा

रामाची तर भाषा बोला
रामपुरी पण सोबत ठेवा

संध्याकाळी न चुकता या
मयखान्याची इज्जत ठेवा

नेकी कर के डाल कुंए मे
ही कामाची पद्धत ठेवा

4 comments:

  1. मयखान्यात बसून
    कोरडाच राहिलो मी
    गझला तुमच्या वाचून
    झिंगून गेलो मी

    मयखाने ओस पडतील
    असे काही लिहू नका
    लेखणीतील दारु तुमच्या
    शब्द रुपात सांडू नका

    नाव तुमचे असे इंगळे
    गझल रूपाने डसू नका
    लिहित जा नशिल्या गझला
    आमचे प्याले रिकामे ठेवू नका

    सर आपण फार सुंदर लिहीलयं

    ReplyDelete
    Replies
    1. कवी बाबूराव बळीराम शिंदे
      मोबाईल नंबर 7738099998

      Delete
  2. मयखान्यात बसून
    कोरडाच राहिलो मी
    गझला तुमच्या वाचून
    झिंगून गेलो मी

    मयखाने ओस पडतील
    असे काही लिहू नका
    लेखणीतील दारु तुमच्या
    शब्द रुपात सांडू नका

    नाव तुमचे असे इंगळे
    गझल रूपाने डसू नका
    लिहित जा नशिल्या गझला
    आमचे प्याले रिकामे ठेवू नका

    सर आपण फार सुंदर लिहीलयं

    कवी / लेखक बाबूराव बळीराम शिंदे
    मोबाईल नंबर 7738099998

    ReplyDelete