दोन गझला : कमलाकर देसले

१.

मनाचे लाड केले मी
बिजाचे झाड केले मी

तशा सगळ्याच इच्छांना
किती खादाड केले मी

कमी झालीत दुःखे, पण
सुखाला हाडss केले मी

कमी होतीच उंची, पण
स्वतःला माड केले मी

तुझ्यासाठीच कायमचे
मला ओसाड केले मी

स्वतःच्या मुक्तिचे चिंतन
गजांच्या आड केले मी

२.

जे जसे ते तसे दावतो आरसा
स्थितप्रज्ञापरी वागतो आरसा

चेहरा छान की घाण हे सांगतो
कोण हा आपला लागतो आरसा?

पाहतो राम वा रावणाला जरी 
हालतो ना कधी डोलतो आरसा

टाळतो बोलण्याचीच भाषा, तरी-
सर्व शब्दाविना सांगतो आरसा

फोडला तोडला भग्न झाला तरी
सत्य आहे तसे दावतो आरसा

सारखी आरसा पाहते ती जरी
मेनकेला कुठे भाळतो आरसा ?

चेहऱ्याशीच तो बोलतो तेवढा
आरशाशी कुठे बोलतो आरसा?

4 comments: