दोन गझला : संदीप जाधव

१.

ती सुखाने नांदते कुठल्या घरी माहीत नाही
लागली आहे कुणाला लॉटरी माहीत नाही

जाळला माझ्यातला हळवेपणा मी ह्याचसाठी
ही तुझी दुनिया किती आहे खरी माहीत नाही

जग विचारत राहिले निर्जीव ह्या देहास पत्ता
देह सांगत राहिला, "सध्या तरी माहीत नाही"

पंचनामा खून करणाराच जर करणार आहे
न्याय हा असणार की, 'मारेकरी माहीत नाही '

आज तू दिसता युगांनी भेटलो आहे मला मी
मी कुठे होतो मला मध्यंतरी माहीत नाही

काल जी होती हसत अल्लडपणे माझ्या बरोबर
ती कशी झाली अचानक लाजरी माहीत नाही

जे म्हणत आहेत त्यांचे दुःख आहे खूप मोठे
जौनची नक्कीच त्यांना शायरी माहीत नाही

२.

शेवटी करते असर काळ नावाची दवा  
कातडी करते निबर काळ नावाची दवा  

चेहरा जो नेहमी यायचा डोळ्यांपुढे 
पाडते त्याचा विसर काळ नावाची दवा

आपल्या नकळत सदा लेप लावत राहते 
व्रण लपवते खोलवर काळ नावाची दवा

ध्वस्त जर झालेच तर गाव एखादे कुठे  
वसवते तेथे शहर काळ नावाची दवा 

ठेवते ध्यानामध्ये मागचा संसर्ग अन्
टाळते नजरानजर काळ नावाची दवा

1 comment: