१.
झालाय तो विषाणू शिरजोर फार आता
केलेत बंध त्याने कमजोर यार आता !
मसनास आग आहे मोठीच लागलेली ,
केव्हाच काय नाही ती थांबणार आता ?
देहास मोल नाही ,सरणास भाव आला ,
प्राणास प्राणवायू का खुंटणार आता ?
तो युद्ध जिंकला बघ शस्त्राविनाच सारे
अन् नामवंत ठरले सारे भिकार आता
करतो विकास जहरी सैतान चीन आहे ,
झालेत देश बाकी कंगाल , ठार आता !
मानव समाज सारा चिंतेत मग्न आहे
बघ राहिला न कोठे तो रोजगार आता
उद्योग बंद झाले ,हातास काम नाही ,
पोटास भाकरीचा बसलाय मार आता
२.
झाला प्रकोप मोठा ,नाराज काळ आहे
सृष्टीस छेडणारा मानव खट्याळ आहे
काळास बांधले हे समजू नकोस वेड्या ,
हातात घातले तू किमती घड्याळ आहे .
करतोस स्पर्श का तू जातीयतेस भावा
आलाय रे तिलाही आता विटाळ आहे
वाहून हाय गेले पाण्यात सत्य सारे ,
उरलाय भावनांचा नुसताच गाळ आहे
कित्येक पावसाळे झेलून यार झाले
विझणार ना कधी मी,आतून जाळ आहे
व्यापार आज स्पर्धा,झालीय फार मोठी
जिंकेल तोच ज्याची,वाणी मधाळ आहे
३.
सांभाळ रुक्मिणी तू रंगास विठ्ठलाच्या
घुसलेत वर्णभेदी रांगेत दर्शनाच्या
करतात भेद भुरटे सर्रास कातडीचा
देतील रंग ढवळा अंगास सावळ्याच्या .
देवून नाव ' विठ्ठल ' ते संग्रहास त्यांच्या ,
असतात रोज येथे ,ध्यासात पुष्पकाच्या !
संतास हाय ज्यांनी छळले अपार होते ,
दिसतात तेच हल्ली चौफेर मंदिराच्या .
का रोखले हरीला तू सोड पुण्डलीका
बघतात वाट सारे ,कणसात बाजरीच्या .
'वारी'स नित्य येतो ,आम्हीच पांडुरंगा
ये विठ्ठला अता तू ,मोर्चात मानवाच्या .
..............................
अनिल एस.पाटील
No comments:
Post a Comment