१.
फक्त वरवरचा तुझाही कळवळा
आणि खोटा दाटला आहे गळा
हात माझा सोडला आहे तिने
सोडला नाही तिने गोतावळा
रात्र अंधारातली आहे जणू
जा कवडश्यांनो अता मागे वळा
जर तुला अप्रूप नाही राहिले
का तुझ्यासाठी उगाचच हळहळा
चांदण्यांनी पेरलेल्या चांदण्या
चांदण्यांनी फुलवला आहे मळा
कोकिळेसाठीच घरटे बांधले
आणि घर सोडून गेला कावळा
लागली शर्यत 'शशी' दोघांमध्ये
देह-आत्मा सांगतो आहे 'पळा'
२.
दुःखाच्या बागेमधला माळी मी
हिरमुसलेले फुल संध्याकाळी मी
हळू हळू ही गर्दी जमली आहे
एकटाच होतो कोणेकाळी मी
सहन किती करणार अत्याचार तरी ?
कधीच नाही फुटलेली हाळी मी
ही मैफिल देते आहे दाद मला
मात्र तुझ्या वाहवातली टाळी मी
रक्ताच्या धारेतुन जर उगम तुझा
मला वाटते बाईची पाळी मी
३.
जळतो त्याचा धूर चांगला आहे
चिंतेचा कापूर चांगला आहे
फक्त तिचे बोलणेच मोहक नाही
रागाचाही सूर चांगला आहे
कळत नसावी चूक मला माझीही
बाकी मी भरपूर चांगला आहे
वाहू द्यावे भरलेल्या डोळ्यांना
डोळ्यांमधला पूर चांगला आहे
किती भांडतो सोबत असताना मी
दूर ठेव, 'मी' दूर चांगला आहे
४.
पुन्हा नव्याने जुनेच क्षण आलेले
माझ्यावरती हे दडपण आलेले
तू हातावर हात ठेवला होता
देहाला मोहरलेपण आलेले
दुःख लगडले होते पानोपानी
आणि स्मृतींना हिरवेपण आलेले
हळदीच्या पायांनी नवरी आली
मागे मागे 'माहेर'पण आलेले
माझ्या नावाचा हार जुना झाला
तिच्या घरी दुसरे तोरण आलेले
मी हृदयाचे चित्र काढले होते
चित्रावर रंगाचे व्रण आलेले
बऱ्याच काळानंतर भेट म्हणाली
पुढे मला अवघडलेपण आलेले
मी माझ्या हट्टाने हळवा झालो
तुला कशाचे हळवेपण आलेले
दिशा दाखवत नावाडी गेलेला
पाण्यावर कसले रिंगण आलेले
पहिल्याच मिठीने जादू केलेली
वाऱ्याइतके हलकेपण आलेले
आई इतका आई झाला होता
बापामध्ये आईपण आलेले
........................
शशिकांत कोळी(शशी)
No comments:
Post a Comment