चार गझला : हेमलता पाटील

१.

अंबरावर शुक्रतारा पाहिजे,बस
तू जवळ अन् मंद वारा पाहिजे,बस

एक प्रेमाचा इशारा पाहिजे, बस
तेवढा जगण्या सहारा पाहिजे, बस

वाढतो आवेग जेव्हा सागराचा
रोखण्या त्याला किनारा पाहिजे, बस

पोळला जातो उन्हाचा देह तेव्हा
सावलीचा मग निवारा पाहिजे, बस

येत जाते ताजगी सुकल्या मनावर
आठवांचा तो शहारा पाहिजे, बस

काळजाचा कोपरा दे मज रहाया
फार नाही, हा उबारा पाहिजे,बस

भडकते ज्वाळा पुन्हा राखेतुनीही
पेटता हृदयी निखारा पाहिजे,बस

शायरीही कागदावर जन्म घेते
दोन ओळींचा पसारा पाहिजे, बस

२.

चूल भाकरी,चटक्यावरती गझल लिहावी
हातावरच्या फोडावरती गझल लिहावी

कधी वाटले प्रेमावरती गझल लिहावी
हृदयामधल्या कृष्णावरती गझल लिहावी

दाण्यांसह जे देह स्वतःचा भरडुन घेते
कधीतरी त्या  जात्यावरती गझल लिहावी

कधी आपले आठवायचे जुने दिवस अन्
पोटामधल्या जाळावरती गझल लिहावी

नकोत केवळ शब्द गोजिरे,स्वप्न साजिरे
उर्मठ कर्मठ सत्यावरती गझल लिहावी

लिहिण्यासाठी हवे कशाला शाई कागद
ओठाने त्या ओठावरती गझल लिहावी

नेहमीच का लिहावयाचे ओघळावरी
सोशिक एका थेंबावरती गझल लिहावी

रसरसलेला बघून घ्यावा गुलमोहर अन्
वैशाखातील वणव्यावरती गझल लिहावी

खोल गहन जर लिहावयाचे पाण्यावरती
तुझ्या आतल्या डोहावरती गझल लिहावी

शब्द बोलके ओळ प्रवाही करून घ्यावी
स्तब्ध साचल्या मौनावरती गझल लिहावी

जगता जगता मरणावरती गझल लिहावी
मरता मरता जगण्यावरती गझल लिहावी

३.

भरून घेते तुडुंब रांजण,बाकी काही नाही
आठवणींची मनी साठवण,बाकी काही नाही

डोळ्यांमध्ये झाक लालसर,सुजल्यात कडा दोन्ही
सोसत नाही अता जागरण, बाकी काही नाही

कधी नव्हे ते चेहऱ्यातुनी दुःख झिरपते आहे
टिचले खोटे सुखी आवरण, बाकी काही नाही

ही प्रेमाची गझल आमची बादच केली त्याने 
चुकले होते जरा व्याकरण, बाकी काही नाही

आधी चालत होतो सोबत,एकटाच पण आता
तिने घेतले वेगळे वळण, बाकी काही नाही

चांदव्याविना किती वाटते काळरात्र ही मोठी
आयुष्याला लागले ग्रहण, बाकी काही नाही

सौभाग्यवतीचे कुंकू बघुनी बळेच हसली ती
अन् ठसठसले हिरवे गोंदण,बाकी काही नाही

४.

तुझाच दरवळ फुलात माझ्या
जखम सुगंधी उरात माझ्या

तुझ्या विजा अन् तुझेच वादळ
तुझेच ओघळ नभात माझ्या

जुनीच भळभळ जुनीच ठसठस
अजून आहे व्रणात माझ्या

तुझ्या व्यथेचे बरेच केशर
हळू मिसळले उन्हात माझ्या

म्हणे सदा मी घरात असते
अनेक चिंता मनात माझ्या

हळू बिलगला तुझा कवडसा
उजेड झाला तमात माझ्या

मरून गेली अनेक स्वप्ने
अनेक इच्छा हयात माझ्या

तुझ्या स्मृतींचा खडा पडावा
लहर उठावी तळ्यात माझ्या

पिसाट वारा मिठीत शिरतो
क्षणात त्याच्या क्षणात माझ्या

उडू दिले ना तुझ्या छताला
अजून ताकद कुडात माझ्या

कुठे न दिसली जगात आई
असेल का ती धड्यात माझ्या?
 
...................
 
हेमलता पाटील

No comments:

Post a Comment