दोन गझला : किरणकुमार मडावी


१.

मी जगाला चांगला अन् वाटतो की नीट आहे
हे मला माहीत आहे, मी किती वाईट आहे

कोणत्या नजरेत हिम्मत, ना मला लागायची ही
तूच माझ्या पापण्यांची काजळाची तीट आहे 

ती जशी येते मिठीशी, एवढे कळते मला की, 
लाजणारा हा दिवस अन् रात्र साली धीट आहे 

गोडवा हा साखरेचा  ठेव तू ओठात तुझिया,
कोरड्या मी भाकरीवर,ठेवलेले मीठ आहे

मी कथा आहे ढगांची, अन व्यथा आहे धरेची,
वाचुनी येते भल्यांना, सारखी ही फीट आहे

देश मंदिर देश मस्जिद, चर्च अन गुरद्वार आहे,
येथला प्रत्येक माणुस पायव्याची वीट आहे

२.

प्रश्न माझा हा कधी सुटणार नाही का? 
मी भले  पडलो तरी उठणार नाही का? 

माझिया डोळ्यास जर दिसलीच नाही तू
मग मनाचा आरसा फुटणार नाही का?

ठेवले व्याजात आहे स्वप्न मी सारे
झोप येथे रात्र मग लुटणार नाही का? 

टाळतो मी उंच जाणे नेहमी येथे
लागली जर का हवा तुटणार नाही का?

काय मक्ता चांगल्याचा तू 'किरण' घेतो,
टाळ कोणीही तुझे कुटणार नाही का?

No comments:

Post a Comment