दोन गझला : साै. गौरी ए. शिरसाट

१.

भेटू तुला अशी कशी चोरून सारखी
येऊ कशी रितीस मी मोडून सारखी

दाटून भावना पुन्हा येतात बोचऱ्या
पाहू किती व्रण जुने सोलून सारखी

नव्हते मनोमनी जरी थांबायचे मला 
जाऊ कशी तुला रिते सोडून सारखी

संसार चालवायला सोडेन गर्व मी
जातेस तू घरास का मोडून सारखी

माझ्या मनातले खरे कळते तुला तरी
का बोलतोस तू मला टोचून सारखी

२.

साथ देणे तूच जेव्हा टाळल्यावर
मी उभी राहू कशी मग बोहल्यावर

भय जराही वाटले ना मज तमाचे
चांदण्याचा मी भरोसा ठेवल्यावर

सोड तू आता अबोला जीवघेणा
त्रास होतो मौन इतके पाळल्यावर

बोलले ना जे कधीही भेटल्यावर  
सांत्वनाला तेच आले जाळल्यावर

आसवांना गाळता आलेच नाही  
दु:ख माझे पापणीशी गोठल्यावर

सोडले मी गाव माझे आणि घरही
जोर पाण्याचा पुन्हा त्या वाढल्यावर

एकटीने स्वप्न मी साकार केले
हात तू अर्ध्यात माझा सोडल्यावर
........................
सौ.गौरी ए.शिरसाट,
विक्रोळी,मुंबई

8 comments: