चार गझला : संजय गोरडे


१.

कवी सौभद्र नावाचा इथे कोणीतरी आहे 
गझलच्या पालखीचा मामुली खांदेकरी आहे 

जिच्या काठी उभा मी जन्मभर व्याकूळल्यावानी 
गझल माझ्या-तुझ्यामधली अशी गोदावरी आहे 

जसा आजन्म हा भाता सुरू आहेच श्वासांचा
तशी ही गझलही त्या ईश्वराची बासरी आहे 

जसे अवधान देहाचे विसरतो संत गोरोबा 
तशी माती तसे पाणी गझलच्याही घरी आहे 

जनी आयुष्यभर हे श्रेय देते नामदेवाला 
परंतू ते खरे नाही, तिची ओवी खरी आहे

जिथे त्या संत चोख्याची महारी रोज घुटमळते 
गझल त्या नामदेवाची सुखाची पायरी आहे 

तुझ्या वाचून श्रीखंड्या रिकामा आजही रांजण 
तुझी अद्याप कावड राहिली नाथाघरी आहे 

२.

स्वत: अडवून साऱ्यांची गती आपण
स्वत:पुरतीच केली उन्नती आपण

पुढेमागे कधी संधी मिळाली तर 
जगाला पोचवू आणखी क्षती आपण 

पुन्हा ठेवून अंधारात दुनियेला
मिळुन मिसळून लाटू सवलती आपण 

जरी आहोत एका संप्रदायाचे 
कुठे रे पाळतो चालीरिती आपण 

भजत नाही कुणी कुठल्याच देवाला 
इथे नुसतीच करतो आरती आपण

दिखावा फक्त करतो प्रेम असल्याचा 
कधी झालो कुणाचे सोबती आपण?

३.

का तुझ्या दारी उभा? माहीत नाही 
कोण मी आहे तुझा? माहीत नाही 

काय आहे आपल्या दोघात नाते
कोणती ही श्रुंखला माहीत नाही 

कोण परका हे कसे ठरवायचे मी? 
कोण आहे आपला माहीत नाही

फक्त झालेली सजा भोगीत आहे 
काय मी केला गुन्हा? माहीत नाही 

मान्य मीही एक प्रकरण या कथेचे
पण मला सारी कथा माहीत नाही 

अन तसेही जे मला माहीत आहे 
ते तुला सांगू कसा? माहीत नाही 

काय सांगू मी तुला? जेथे मलाही 
चेहरा माझा खरा माहीत नाही !

४.

पुन्हा माझ्याजवळ घेऊन आले मन तुला 
पुन्हा लागेल बघ माझ्यामुळे लांछन तुला 

कशाला आज हे औदार्य दाखवतोस तू?
कधी माझीच होती वाटली अडचण तुला 

मुखोटा काढ, दाखव चेहरा असली तुझा
मुबारक हे तुझे उसनेच मोठेपण तुला 

अजुनही या भ्रमामध्येच आहे मी तरी 
पुढे केव्हातरी होइल तुझे दर्शन तुला 

मला सौभद्र उत्तर दे मिळाल्यावर तुला
कशासाठी फिरवते ही तुझी वणवण तुला? 
....................................
संजय गोरडे ' सौभद्र '

4 comments: