तीन गझला : सतीशसिंह मालवे


१. 

ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली
दाबून भूक आम्ही पोटात ठेवली

आयुष्यभर उन्हाच्या मी सोसल्या झळा
पण सावली घरावर तैनात ठेवली

मी शोध घेत आहे,त्यांचा अजूनही
ज्यांची खरी कहाणी अज्ञात ठेवली

मी काय ऐतिहासिक माणूस वाटलो?
बनवून मूर्त माझी चौकात ठेवली

भोळ्या बळीस इथल्या फसवून वामना
घालून लाथ अमुच्या डोक्यात ठेवली

होईल काय वैद्या उपचार नेमका?
ताजी जखम मनाच्या जर आत ठेवली

२.

गावाकडून आला शहरात एक पक्षी
पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी

अंधार जीवनाचा करण्यास दूर अंती
सूर्याकडे निघाला रागात एक पक्षी

पाहून झेप त्याची आश्चर्य होत आहे
झाला असेल मोठा त्यांच्यात एक पक्षी

लावून एक डोळा टिपला अचूक पक्षी
आहे अजून माझ्या स्मरणात एक पक्षी

सोडून देश माझा आलो उगाच येथे
चिंता करून मेला विरहात एक पक्षी

कुंकू तुझ्या कपाळी पाहून आज माझे
रुसला असेल बहुधा लग्नात एक पक्षी

सोसून झळ उन्हाची दाणे टिपून येतो
दिसतो मला हमेशा बापात एक पक्षी

३.

आधी व्यथा सोसून घे...बाकी बघू पुढचेपुढे
दुःखास कवटाळून घे...बाकी बघू पुढचेपुढे

काटे कुठे रुतले मला,माझे मला ठाउक सखे
गजरा तुझा माळून घे...बाकी बघू पुढचेपुढे

होऊ नये अपुल्यामुळे वाईट कोणाचे कधी!
इतुके इथे समजून घे... बाकी बघू पुढचेपुढे

भर पावसामध्ये कसे दिसणार अश्रू आपले?
पाण्यामधे मिसळून घे...बाकी बघू पुढचे पुढे

रस्ता जसा आहे तसा, त्यावर प्रवासी चालतो
ध्येयास तू गाठून घे... बाकी बघू पुढचेपुढे

तो आज संसारामुळे बंदीस्त पोपट जाहला
त्याची दशा पाहून घे... बाकी बघू पुढचेपुढे

येईल थकवा जीवना, चालायचा जेव्हा तुला
वळणावरी थांबून घे.... बाकी बघू पुढचेपुढे

........................
सतिशसिंह मालवे
मु-हा देवी

2 comments:

  1. अप्रतिम अंक
    माझ्या तीन गझलांना अंकात स्थान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete