१.
हे युद्ध अनीतीशी, माघार कसा घेऊ?
मी भ्रष्ट दलालांचा कैवार कसा घेऊ?
व्यापार घसाऱ्याचा नाहीच कधी केला
देऊन उजेडाला अंधार कसा घेऊ?
नाकारत प्रेमाला आलीस किती वेळा
लाचार तुझा आता होकार कसा घेऊ?
माझ्याच विनाशाचा तो डाव तुझा होता
हातून तुझ्या आता सत्कार कसा घेऊ?
ठाऊक मला होत्या गंभीर चुका काही
माझ्याच गुन्ह्याची मी तक्रार कसा घेऊ?
श्रीमंत तुझा बाणा, तू ठेव तुझ्यापाशी
हातात कुणाची मी पैजार कसा घेऊ?
तारील जगाला या, हे तत्त्व अहिंसेचे
हातात विनाशाचे हत्यार कसा घेऊ?
विज्ञानयुगाचा मी पाईक अता झालो
पोथ्या नि पुराणांचा आधार कसा घेऊ?
२.
स्वप्नात वा सत्यात तू भेटून जा केव्हातरी
दुःखी मनाला गारवा देऊन जा केव्हातरी
जे लाभले त्या जीवना कित्येकदा गेले तडे
आहे तुला जे शक्य ते सांधून जा केव्हातरी
वाऱ्यापरी मी हिंडलो पाऱ्यापरी मी पांगलो
का कोंडली माझी व्यथा? ऐकून जा केव्हातरी
एकांत हा झाला सखा गातो विराण्या एकटा
दु:खावरी तू फुंकरी मारून जा केव्हातरी
झेलू किती मी संकटे? हा मोडला माझा कणा
खोटी दुराव्याची दरी लांघून जा केव्हातरी
शोधू कुठे? धावू किती? रक्ताळले पाऊलही
वाटेवरी त्याचे ठसे शोधून जा केव्हातरी
त्या गोठल्या संवेदना, भीती कुठे आता मनी?
जा सांग त्या मृत्यूसही घेऊन जा केव्हातरी
ते वायदे गेले कुठे?
का झाकले डोळे तुझे?
कोणी किती केल्या चुका मोजून जा केव्हातरी
भांडू जरी, बोलू तरी, कापू जरा मौनांतरे
आक्षेप जो माझ्यावरी सांगून जा केव्हातरी
३.
सावल्या माझ्या अशा चालल्या माझ्यापुढे
वाकुल्या दावीत त्या नाचल्या माझ्यापुढे
दालने माझ्या यशाची कुठे झाली खुली?
ऐन वेळी तू व्यथा मांडल्या माझ्यापुढे
भोगले मी जीवनी एवढे दुःखास की
वेदना माझ्या किती लाजल्या माझ्यापुढे
वाटले होते मला सोबती येशील तू
का तुझ्या संवेदना गोठल्या माझ्यापुढे?
मी सुखासाठी तुझे विश्वही धुंडाळले
स्वागताला त्या व्यथा धावल्या माझ्यापुढे
बोललो मी फक्त "कविता खरी माझी सखी"
तू कवितेच्या वह्या फाडल्या माझ्यापुढे
कोणत्या वाटेवरी नेमके चालायचे?
केवढ्या नीतीकथा वाचल्या माझ्यापुढे
ठेवला माझ्यावरी एवढा विश्वास तू
का बरे आणा अशा घेतल्या माझ्यापुढे
काय कामाची तुझी घातकी आश्वासने?
भावना वेशीवरी टांगल्या माझ्यापुढे
.......................
चंद्रकांत धस
निगडी, पुणे-४११०४४
भ्रमण ध्वनी: ९९७०४५२५२५
No comments:
Post a Comment