१.
जायचे आहेच जर गावाकडे
न्यायचे नाही शहर गावाकडे
पावसाला यायचे असलेच तर
वेचण्या यावे बहर गावाकडे
बांध बांधाला नसावा फक्त वा
केवढा होतो कहर गावाकडे !
काकडा ते चांदण्याच्या चादरी
देखणे अष्टौप्रहर गावाकडे
भौतिकाची कौतुके नसतात रे
जिंदगी असते सुकर गावाकडे
जाहली शहरात नात्यांची व्यथा
लागतो पदरा पदर गावाकडे
बांधला नाहीच वृद्धाश्रम कुणी
आजही शाबूत 'घर ' गावाकडे !
२.
देणगीची पावती सन्मान नसते
शेवटी ती देणगी.. ते दान नसते
एवढे सांगा जरा कोणी मुलाला
बाळ, बापाची शिवी अपमान नसते
लेक सांभाळा तसे आईससुद्धा
श्वापदांची वासना सज्ञान नसते
पावसाळा येत आहे काळजी घ्या
घसरण्याला वय वगैरे भान नसते
किर्र काळोखासही असतोच मृत्यू
येथल्या अवसेसही वरदान नसते
का खरे बोलेल सांगा वेधशाळा
सातबाऱ्यावर तिच्या जर रान नसते ..?
३.
अंगण नसल्याची त्याला कोठे सल आहे
घर आहे की फक्त विटांचे जंगल आहे ?
एक निघाला पुढे लगोलग मागे दुसरा
एक श्वास दुसऱ्या श्वासाची नक्कल आहे
कशास वाऱ्या मनासवे लावावी स्पर्धा
नकोतेवढे ते वेडे जर चंचल आहे
अफवांच्या किमयागारीला लगाम घाला
त्यांच्यापायी घडली नियमित दंगल आहे
मन एखादा क्षण पांघरते जगण्याखातर
तो क्षण येतो त्याने जगणे मंगल आहे
धर्म बुडाला बघताबघता जिथे खोलवर
माणूस नावाच्या प्राण्याची दलदल आहे
साहित्याच्या दर्जाला साधी फूटपट्टी
जिथे नांदतो माणूस ते ते अव्वल आहे !
४.
दु:ख झाले फार तर
आसवांचा हात धर
व्यसन हे उत्तर नव्हे
प्रश्न तर आयुष्यभर
पंख दे श्वासास तू
मग पहा माझी सफर
जात म्हणजे अंतिमा
सोड ती,सुरुवात कर
गाव सांभाळा जरा
व्हायचे त्याचे शहर
व्यक्त व्हा रे, अन्यथा
जायचे मौनात घर
देह आत्म्याचा धनी
समज की आहे कहर ?
....................................
विश्वास कुलकर्णी, कोल्हापूर
No comments:
Post a Comment