तीन गझला : अमोल शिरसाट


१.

ना कधीही पूल,रस्ता, रूळ गरजेचे
गाठण्याला ध्येय केवळ खूळ गरजेचे

एकदा अश्रू पुसा डोळ्यात आलेले
देव दिसण्याला कुठे देऊळ गरजेचे

आत मुंग्यांची कुठे आहे खरी गर्दी?
भोवती आहे उभे वारूळ गरजेचे

जात नसते, धर्मही नसतो तहानेला
अन् कुठे असते नदीला कूळ गरजेचे

कायदे समजून घे आधी रुजायाचे
अंकुराआधी बिजाला मूळ गरजेचे

बिनखिशाची कापडे अंतीम यात्रेला
पूर्ण होते शेवटी वर्तूळ गरजेचे

२.

चकवा होता की धुंदी हे कधीच  कळले नाही
मी इथवर आलो आहे; पण कसा? समजले नाही

दुनियेच्या जत्रेमध्ये आईच्या हातुन सुटले
कुठल्या खेळाला भुलले; लेकरू परतले नाही

वेड्याला दुनिया हसते, दुनियेला वेडा हसतो
पण कोण शहाणे आहे, हे कोडे सुटले नाही

इतक्या वर्षांनी डोळे समोर आले होते पण
ते ओठांवर पूर्वीचे का हसू उमटले नाही?

जे लिहिले आहे त्याचा काहीच फायदा नव्हता
जे मनास टोचत होते, शब्दात उतरले नाही

३.

पाहु दे तुजला घडीभर आणखी काही नको
हात हाती हा जरा धर,आणखी काही नको 

सैलही होऊ नये; गळफासही वाटू नये
ठेव हे नात्यात अंतर,आणखी काही नको

मोकळे बोलू, हसू आपण,रडू मनमोकळे
एकदा होऊ अनावर, आणखी काही नको

मागणे इतकेच आहे फक्त पंखांना मिळो
मोकळे उडण्यास अंबर,आणखी काही नको 

काय जेही व्हायचे ते होऊ दे पुढच्या क्षणी
या क्षणाला साजरे कर,आणखी काही नको 

1 comment: