तीन गझला : प्रतिभा सराफ


१.

प्रत्येकाच्या मनात असते, एक नदी छोटीशी,
आत कोरडी, पण खळखळते एक नदी छोटीशी

खडकांमधुनी अडकत दबकत,वाट शोधते अपुली
'बांध नका मज घालू', म्हणते एक नदी छोटीशी

भेटत जाते मानवांस अन् कधी पहाडालाही,
बिलगत जाते अन् हिरवळते एक नदी छोटीशी 

राजा, साधू फकीर कोणी, काठावरती बसतो,
अलगद त्याचे पाय भिजवते, एक नदी छोटीशी! 

वादळवारा,पाउसगारा, सहनच करते सारे
भळभळणाऱ्या जखमा जपते एक नदी छोटीशी

अल्लड तरुणी होउन भेटे सख्या सागरा अपुल्या 
तनामनाने सहजी मिटते एक नदी छोटीशी

२.

याला त्याला चाळत चाळत जगत राहिले
प्रलोभनांना भाळत भाळत जगत राहिले

दवबिंदूना टिपण्याआधी गेला श्रावण
मी अश्रुंना ढाळत ढाळत जगत राहिले

रोज घडाव्या परस्परांच्या गाठीभेटी
या स्वप्नाला जाळत जाळत जगत राहिले

तुझ्या फुलांच्या बागेमधुनी येता जाता
गंध फुलांचा माळत माळत जगत राहिले! 

पांघरला तू भारी शेला नवीन कोरा
मी दोरीवर वाळत वाळत जगत राहिले

गुणवत्तेला वाढवता मज आले नाही 
पण दोषांना गाळत गाळत जगत राहिले

३.

कधी ही सांज ढळली अन् कधी अंधारल्या वाटा          
दिला तू हात हाती अन् उजळल्या बघ पुन्हा वाटा

उराशी घेतले जेव्हा तुझे ओझे जरासे मी 
रितेपण संपले माझे तुलाही गवसल्या वाटा

समोरी आज माझ्याही फुलांचे ताटवे सारे 
तरी का आठवे नाते नि काटेरी जुन्या वाटा? 

उदासी आत सलताना पुन्हा तू भेटला राती 
फुलूनी रातराणी मग कशा गंधाळल्या वाटा 

निशाणी मागतो आता कशाला आज प्रेमाची?            
खुणा या पावलांच्या बघ जणू रक्ताळल्या वाटा! 

........................
प्रा. प्रतिभा सराफ
इ-1503, रुणवाल सेंटर, 
गोवंडी स्टेशन रोड,
देवनार, मुंबई 400088
इ-मेल: pratibha.saraph@gmail.com 
मोबाईल:9892532795

1 comment:

  1. एकसे बढकर एक गझल...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete