१.
अंधार सोबतीला घेऊन चालताना
जगणे मला कळाले माणूस शोधताना
कडवेपणा कदापी ओठांवरी न आला
वाणीत ठेवले मी माधुर्य बोलताना
काट्यातल्या फुलांना गोंजारले सुखाने
झाल्या व्यथा सुगंधी आयुष्य वेचताना
सांगू कशी सख्याला माझे मला कळेना
नादावते किती मी स्वप्नात भेटताना
माळू नको फुलांना वेणीत आज माझ्या
खुलली कळी गुलाबी प्रेमात लाजताना
दुःखास अंतरंगी सोशीत राहिले पण
हसरीच राहिले मी दुनियेत वागताना
संसार मांडताना बाईस ज्ञात आहे
संजीवनी जशी ती नात्यास सांधताना
पाठीवरी नको तू सोडूस केस ओले
वेडावतो प्रिया मी लावण्य पाहताना
कान्हा नकोस छेडू तू सूर बासरीचे
तल्लीन राधिका ती भक्तीत नाचताना
२.
एकएक ती सीमारेषा मोडत गेली
आकाशाला उंच गवसणी घालत गेली
पायामध्ये बेड्या कोणी जरी ठोकल्या
रोज रोज ती उंबरठ्याला लांघत गेली
निर्धाराने काळोखाशी लढत राहिली
ज्योत लावुनी अंतरातली उजळत गेली
बीज पेरले संस्काराचे नात्यांमध्ये
बाग मनाची आनंदाने फुलवत गेली
दुःख मुक्याने नांदत होते हृदयामध्ये
मुखड्यावरती भाव हासरे ठेवत गेली
शोधत होती नवीन वाटा सातत्याने
पुन्हा नव्याने तीच स्वतःला गवसत गेली
पदरी आले दुःख नेहमी खचली नाही
क्षणा क्षणाला संचितासवे झगडत गेली
आयुष्याच्या संध्याकाळी तुटली नाती
आठवणींच्या सवे एकटी चालत गेली
कणा वाकला पाठीचा पण कुठे मोडला
संसाराला सुखी बनवण्या राबत गेली
३.
भावनांशी किती खेळते जिंदगी
रोज स्वप्ने तरी पेरते जिंदगी
उंबऱ्यावर जसा पाय मी टाकते
अन् नव्याने मला भेटते जिंदगी
घेरती संकटे लाख येथे जरी
ढाल होऊन ती झुंजते जिंदगी
निर्मिकाने दिले छान आयुष्य हे
कालचंक्रास या भेदते जिंदगी
रातराणी जशी दरवळू लागते
गंध होऊन ती झिंगते जिंदगी
चांदण्यांशी जरा बात झाली सखे
आठवांवर पुन्हा भाळते जिंदगी
पंख लावून मी दूर जावे नभी
कैदखाना नको वाटते जिंदगी
जन्म मृत्यू चुकत हाय! नाही कधी
रोज काळासवे धावते जिंदगी
प्राक्तनाचा सदा चालतो खेळ पण
जंग करुनी पुन्हा जिंकते जिंदगी
वाह अप्रतिम
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteवाह अतिशय अप्रतिम गझल आहेत..
ReplyDeleteवाह अप्रतिम
ReplyDeleteतीनही गझल खूपच सुंदर मिनाक्षीताई
ReplyDelete