१.
रात्री तुझ्या रुपाची चर्चाच फार झाली
गंधीत मोगऱ्याची चर्चाच फार झाली
शहरात देखण्यांची ख्याती किती परंतू
उत्फुल्ल तूच याची चर्चाच फार झाली
तू दूर जरी तेथे, येथे सुगंध येतो
तव रूपयौवनाची चर्चाच फार झाली
डोळे तुझे मदाळी, हसरे सलाम देती
बुजऱ्या परी मनाची चर्चाच फार झाली
सुचल्या नव्या ऋतुंच्या गझला सुरेल काही
नवख्या ऋतू-सणाची चर्चाच फार झाली
मैफील शायरीची नुकती फुलून गेली
तेथे मुक्या धुक्याची चर्चाच फार झाली
कौजागिरीस रात्री जो भरवला विडा तू
त्या रंगल्या विड्याची चर्चाच फार झाली
२.
पहाटवारे नव्या मनूचे अडून गेले
अता अताशी नको नको ते घडून गेले
किती कितीदा करू इशारे तुला अता मी?
खरेच वेडे, तुझ्याविना मन अडून गेले
सभोवताली उडाळ वारे अटीतटीचे
नेक दिलाचे शरीर सारे सडून गेले
कशास करशी सखे बहाणे नवेपणाचे ?
(मनामनाचे कधीच नाते जडून गेले)
विजयासाठी सुरू लढाई घडीघडीला
नको नको ते भिडू अवेळी भिडून गेले
कशी लढू मी अता लढाई यशाजयाची?
उणेपणाचे विचार सारे नडून गेले
किती करू मी तुझी प्रतीक्षा? अगा नशीबा
आजवरीचे आयुष्य माझे उडून गेले
................................... अशोक म. वाडकर
'अक्षर', ए/१४६ फुलेवाडी, कोल्हापूर
४१६ ०१० मोबा. ७०२००११४०८.
त्या रंगल्या गजलांची तारीफ फार झाली
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद, मोहनजी!
Delete