चार गझला : अमित वाघ

१.

ज्यांचे नशीब भाळी असते...
श्रद्धा त्यांची काळी असते...

कधी नव्हेतर येते साळी...
कोठे रोज दिवाळी असते...

धारदार मी शेर टोचतो...
मग जखमींची टाळी असते...

तेल मीठ भेटते पिठाला...
अन् कोंड्याला जाळी असते...

सुर्यालाही गिळते शंका...
अंधाराहुन काळी असते...

गळ्यात असते आजकाल नथ..
अन् भुवईवर बाळी असते...

पाच दिवस मंदिरास टाळा...
देवीलाही पाळी असते...

२.

गाव हिंडुनी खाल्ला चारा... केवळ हिंदू असतो का...
मंदिरातला रवंथ सारा.. केवळ हिंदू असतो का...

नेजा देतो मला मौलवी मोर पिसांनी माथ्यावर...
मग कुठलाही मोर पिसारा... केवळ हिंदू असतो का...

जात्यामध्ये सारे काही भरडुन निघते फिरल्यावर...
मग या देशाला दळणारा केवळ हिंदू असतो का...
 
हल्ल्याची पाहून बातमी जखम उभ्या या देशाला...
मग गळणारा अश्रू खारा केवळ हिंदू असतो का...

दर्ग्याच्या चादरीतला तो सुगंध घेवुन आलेला...
मंदिरातला पवित्र वारा केवळ हिंदू असतो का...

सांग नेमकी माती कुठल्या जाती धर्माची असते..
देवाच्या मुर्तीचा गारा केवळ हिंदू असतो का...

३.

चुकूनसुद्धा मटकू शकतो...
जो सत्याला पटकू शकतो...

रंगच नाही बदलत सरडा...
दुरून नकळत गटकू शकतो...

"वेळ चांगला" असतो पारा...
क्षणात एका सटकू शकतो...

मलाच नाही लागत ठसका...
घास तुझाही अटकू शकतो...

ट्रेन कधी ना सुटते त्याची...
दारावर जो लटकू शकतो...

विचार माझा करतो जो तो...
मी देवाला खटकू शकतो...

जरी सोडले तू वाऱ्यावर...
मी वाऱ्यावर भटकू शकतो...

त्याचा कुर्ता शुभ्र राहतो...
सराईत जो झटकू शकतो...

४.

कोणीही कोणाचा नाही शहरामध्ये...
अन् दगडाला वाचा नाही शहरामध्ये...

हिंसेने पोखरून खाल्ला गांधी पुतळा...
राजपाट रामाचा नाही शहरामध्ये...

प्रकाश बहुदा इथे जन्मला असे वाटते ...
कंदिलास जर काचा नाही शहरामध्ये...

अधोगतीचे खापर फुटते भुतकाळावर...
तरी नेहरू चाचा नाही शहरामध्ये...

ज्यात टाकुनी देवाचाही माणुस बनतो...
असा कोणता साचा नाही शहरामध्ये...

इथे माय सख्ख्या पोराला परका म्हणते...
मामा नाही भाचा नाही शहरामध्ये...

अमित वाघ

2 comments: